नको अजिंठा वेरुळ, मूर्ती तोडा आणि फोडा...


तिकडे ताजमहल कसा पहा स्वच्छ स्फटीकासारखा पांढराशुभ्र! इकडे बीबी-का-मकबरा गोव-याने थापलेला अन् प्रदूषणाने काळवंडलेला. या मकब-याची अवकळा पाहवत नाही. मकब-याभोवतीच्या गाई-म्हशीचे गोठे आणि वीटभट्ट्यांमुळे मकबरा काळा पडत चालला आहे. केंद्र आणि राज्याचे पर्यटन विभाग एकमेकांना दूषणे देत पण, दोन्ही विभाग मिळून महापालिकेच्या रस्त्यांकडे बोट दाखवितात. या खो-खोच्या खेळात ही पर्यटन राजधानी मात्र खड्ड्यात सापडली आहे.

                नुकतीच पर्यटन पर्वाची सांगता झाली. राज्याची पर्यटनाची राजधानी असलेले औरंगाबाद बेदखल होते. नाही म्हणायला हेरिटेज वॉक, हेरिटेज टॉक असे कार्यक्रम झाले. गेल्या तीन वर्षांपासून विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. गतवर्षी चौसष्ट हजार विदेशी पर्यटक आले, त्यापैकी बारा हजार पर्यटकांनी मकब-यास भेट दिली. देशी पर्यटकही घटलेत. औरंगाबादेतील वारसास्थळेही घटत चालली आहेत. बावन्नपैकी एकेवीस दरवाजे उरले आहेत. डझनभरच कसेबसे उभे आहेत. विभागीय आयुक्तांच्या गुलशन महलसमोर सतराव्या शतकातील दमडीमहल होता. तो महानगरपालिकेने  जमिनदोस्त केला. खरंतर दमडीमहलच्या सभोवती चांगले वाहतूक बेट करता आले असते. जनानामहल, मर्दानामहल यांची अवस्था फारच वाईट आहे. ऐतिहासिक शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाभोवती अतिक्रमणाचा गराडा पडला आहे. कोणीही उठतो आणि जुने पाने सालारजंगची कागदपत्रे फडकावून आपलीच जमीन असल्याचा दावा करतो. यावर्षीच बायजीपु-यातील खासगेटपाडण्यात आले. काही इतिहासप्रेमी मंडळींनी मेणबत्ती मोर्चा काढला, पण लक्षात कोण घेतो. मकाईगेट, बारापुल्लागेट, महेमुद दरवाजा आणि कटकटगेट जवळील पुल केव्हा इतिहासजमा होतील, सांगता येत नाही. पर्यटनाच्या नावाने ढोल वाजवून वेरुळ महोत्सव साजरा केला, म्हणजे पर्यटन वाढत नाही. एमटीडीसीचे माहिती केंद्रही कधीतरी उघडे असायला हवे. औरंगाबाद जिल्ह्यात दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर एकतरी ऐतिहासिक वारसा असलेली वास्तु पहायला मिळते. पण, त्यांचा इतिहास सांगणारा कुणी गाईड नाही. या पर्यटन राजधानीत अवघे तीन गाईड उरले आहेत. खिशात नाही आणा, अन् मला बाजीराव म्हणा, अशी आमच्या पर्यटन राजधानीची अवस्था आहे. ग्वाल्हेरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझममध्ये दोन महिन्याचा गाईडचा अभ्यासक्रम आहे. तिकडे मराठी तरुण फिरकत नाही.

                                जपान सरकारमुळे निदान अजिंठा-वेरूळपर्यंत चांगले रस्तेतरी झाले. या रस्त्यांचीही देखभाल नसल्याने वाट लागली आहे. अजिंठा-वेरूळला पर्यटक येत नाहीत म्हणून भारतीय पुरातत्व मंडळाचा आनंद गगनात मावत नाही. पर्यटकांची गर्दी झाली की, शिल्पांना धोका उद्भवतो हे नेरीचे संशोधन. कार्बनडाय ऑक्साईड आणि धुलीकण यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी इस्त्रोच्या मदतीने औरंगाबाद, अजिंठा आणि गोवा याठिकाणी उपकरणे बसविली आहेत. त्याद्वारे वातावरणातील बदलाचा अभ्यास केला जातो पण कार्यवाही शून्य.

                                शिर्डीला विमानतळ झाल्यामुळे औरंगाबादमार्गे जाणारा पर्यटकांचा लोंढा थांबला. दिल्लीहून येणारी एकच रेल्वे असल्यामुळे उत्तरेकडील पर्यटक कमी प्रमाणात येतात. पर्यटनाच्या नावाने नुसतेच टणटण वाजविले जाते. पण, पर्यटनासाठी आवश्यक असलेला मनोबदल औरंगाबादकरांमध्ये अजुनही घडला नाही, याचे वैषम्य वाटते. मंगेश पाडगावकरांच्या पुढील ओळी आपल्या पर्यटनाचे यथार्थ दर्शन घडविणारे आहेत.

आता सारे बदलले, अहो जग पुढे गेले

नको अजिंठा वेरुळ, मुर्ती तोडा आणि फोडा

गाडी भोवती नटींच्या, आता लोकांचा गराडा