सिंचन अन् कर्जमाफीचे सिमोल्लंघन कधी?

- संजीव उन्हाळे


नारायण राणे आणि शिवसेना यांचे राजकीय सिमोल्लंघन होईल न होईल. पण पुणेकर कर्मचारी औरंगाबादच्या मृद जलसंधारण आयुक्तालयात रूजू व्हावीत, जायकवाडीच्या लाभ क्षेत्राचे संपूर्र्ण सिंचन व्हावे आणि जलयुक्तची अर्धवट कामे पूर्ण व्हावीत, शेतक-यांची ३४ हजार कोटीची कर्जमाफी पदरात पडावी हेच खरे सिमोल्लंघन.

उद्या दसरा. आपल्या पारंपरिक सीमा सोडून पुढे जाण्याचा हा दिवस. यंदा चांगला पाऊस झाला. जायकवाडी, मांजरासारखी धरणे भरली. जायकवाडी आतापर्यंत फक्त नऊ वेळा भरले. लाभक्षेत्रातील १ लाख ८३ हजार हेक्टर जमीन कधीच भिजली नाही. यावेळी सरकारने कॅनॉल दुरुस्तीची धडक मोहीम हाती घेतली तर खरेखुरे सिमोल्लंघन घडेल. अनेक योजना आल्या आणि गेल्या पण दुरुस्ती झाली नाही. रबी हंगमापूर्वी ही संधी आहे. राज्य शासनाने औरंगाबादला मृद जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना वाल्मीच्या इमारतीत केली. वाल्मीच्या महासंचालकांनाच जलसंधारण आयुक्त म्हणून तात्पुरता कार्यभार दिला. पुण्यनगरीत राहणा-या मंडळींना औरंगाबादला राहायचे म्हटले की जिवावर येते. गेल्या चार महिन्यांपासून या आयुक्तालयाला ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिळत नाही. शासनाने याबाबत मृद संधारण आणि वसुंधरा विभागाकडे असलेले कर्मचारी जलसंधारण विभागाकडे वर्ग करावेत असा आदेश काढला. औरंगाबादला जावे लागेल या भीतीने वसुंधरामधील अनेक सल्लागारांनी राजीनामे दिले. मृद संधारण संचालकाचे कार्यालयही या आयुक्तालयाला जोडले जाणार आहे. पण प्रत्यक्षात कोणतीच हालचाल नाही. केवळ कर्मचा-यांची मनधरणी सुरू आहे. या अगोदरही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृषी आयुक्तालय औरंगाबादला स्थापण्याची घोषणा केली. पण कृषी खात्याच्या लॉबीने राजकीय मंडळींना हाताशी घेऊन हा बेत उधळून लावला. आता तरी विकसित भागातील अधिकारी मंडळी औरंगाबादला येऊन आपल्या नोकरीमध्ये सिमोल्लंघन करतील काय?

जलयुक्त शिवार योजना गाजावाजा करीत आली. पहिली दोन वर्षे इतकी गाजली की मुंबई-पुण्याच्या मंडळीना सारा महाराष्ट्र जलयुक्त झाल्यासारखा वाटू लागला. कृषी विभागाचा मुलाहिजा न ठेवता या योजनेचे कंत्राटीकरण झाले. मात्र आता जलसंधारण विभागाने आदेश काढून या कामासाठी २०१३-१४ ची दरसूची लागू केली. त्यामुळे कंत्राटदार बिथरले. त्यांचा नफा घटला. राज्यभरातील २० हजार कामे ठप्प केली तर मराठवाड्यातील नऊ हजारावर कामे रखडली. सरकारचा फ्लॅगशिप कार्यक्रमच थबकला.

पैठणची एक दंतकथा. देवदत्तचा मुलगा कौत्स याने ऋषीकडे विद्यार्जन केले. चौदा विद्या आत्मसात केल्या. ऋषीने शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी चौदा कोटी सुवर्णमुद्रांची गुरूदक्षिणा मागितली. शिष्य रघुराजाकडे गेला. पण यज्ञामुळे राजाचा खजिना रिकामा होता. देवेंद्राला दया आली. त्याने कुबेराला सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडण्यास सांगितले. ऋषीने केवळ चौदाच सुवर्णमुद्रा घेतल्या. त्यामुळे शमीच्या झाडाखाली सुवर्णमुद्रांचा ढिग तसाच होता तो लोकांनी लुटला. सध्याही देवेंद्राचे राज्य सुरू आहे. इच्छा एवढीच की राज्यातील कर्जबाजारी शेतक-यांसाठी ३४ हजार कोटीचा वर्षाव झाला तरच खरे सिमोल्लंघन.