थांब लक्ष्मी कुंकू लावते!


 

मनी वसे, ते जगी दिसेयाप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पैठणकरांना लक्ष्मीदर्शनाचा साक्षात्कार दिला. लक्ष्मी येती घरा तिचा स्वीकार करा, असा संदेश देत दानवेंनी सर्वांना जणू लक्ष्मीदर्शन घडविले. मोदींनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे-हजाराच्या नोटांवर बंदी आणली. पण या निवडणुकीत पैसा काळा-पांढरा राहण्याचा प्रश्नच नव्हता, उलट सारे धन जनधनझाले. मतपेढीत ते किती उतरले हे ज्याचे त्यालाच ठाऊक. 

तसा रावसाहेब दानवे यांचा स्वभाव मोकळाढाकळा. ग्रामीण आणि अर्धग्रामीण लोकांसमोर बोलताना ते जास्त खुलतात. लक्ष्मीदर्शनाचा रावसाहेबांचा अर्थ म्हणे अध्यात्मिक होता. निवडणुकीत अध्यात्म कोठून आले हे त्यांनाच ठाऊक. निवडणुकीच्या आदल्या दिवशी लक्ष्मीदर्शन घडते हेच आम्ही पाहिले आहे. घरामध्ये आलेल्या लक्ष्मीचा अनादर न करता तिला थांब लक्ष्मी कुंकू लावते’, असे म्हटले तर बिघडले कुठे? घरोघर (जुन्या नोटांची) लक्ष्मी नांदेल. पुढाड्ढयांचे काळे धन साड्ढया जनाचे होऊन जाईल. काहीही असो, नोटाबंदीचा काळ भाजपच्या पथ्यावर पडला. प्रचार यंत्रणा फिरे तिथे लक्ष्मी वसे, लक्ष्मी येती घरा तीच निवडणूक धरा अशा किती तरी नवीन म्हणी या काळात तयार झाल्या. इतर पक्षांनी मात्र उमेदवारांना साधे पक्षाचे बॅनरही दिले नाही. भाजपने एकहाती प्रचार यंत्रणा, सूक्ष्म नियोजन, बेरजेचे राजकारण करून राजकीय घराण्यांना जोडले. इतर पक्षांत मात्र दुय्यम पातळीवरची फळीच नगरपालिकेची ही लढाई लढत होती. वाढता खर्च पाहून अनेक पक्षांनी लक्ष्मीची आळवणी केली. वाद होता होता जुन्या नोटांनी लक्ष्मीदर्शन दाखविले पण नोटाबंदीचे विरोधक तेवढेसे देशभक्त नसल्यामुळे लक्ष्मीप्रबळी म्हणे झाली नाही.

या परिस्थितीचा सारा उबग काँग्रेसचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांना आला आणि त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. विनवण्या करूनही राणे, विखेपाटील हे नेते प्रचाराला वेळ देत नाहीत, साधे प्रचार साहित्य पुरविले जात नाही आणि पक्षाचे कार्यकर्ते एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढत राहतात. त्यामुळे गंगापूरची जागा थोडक्या मताने गेली. सत्तार यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे कोणताही आडपडदा न ठेवता आपला उद्वेग व्यक्त केला. अशीच स्थिती शिवसेना, राष्ट्रवादीची होती.

तरी मरावाड्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली. ४७ पैकी १८ नगराध्यक्ष काँग्रेसचे आले. राष्ट्रवादीने ११ जागा घेतल्या तर भाजपला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला ५, भाजप-शिवसेना युतीला १, बहुजन पक्षाला १ आणि इतर १ नगराध्यक्ष निवडून आले. एकूण १०५६ नगरसेवकांपैकी सर्वाधिक ३३४ राष्ट्रवादीचे, २८८ काँग्रेसचे, २०३ भाजपचे तर १३३ नगरसेवक  सेनेचे निवडून आले. जिथे भाजपचा नागरी भागांमध्ये पाया नव्हता, तिथे पक्षाची पायाभरणी झाली ही गोष्ट मान्यच केली पाहिजे. सेनेच्या नगरसेवकांची संख्या काही ठिकाणी वाढली पण आपला ठसा उमटविता आला नाही.

भाजप व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मराठवाड्यातलेच.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात आपला गड राखला. सर्व पक्ष एकत्र येऊन चव्हाणांना घेरतात पण शेवटी ते बाजी मारतात हे पुन्हा स्पष्ट झाले. दोन नगर परिषदा वगळता त्यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या उलट भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना आपला गडही राखता आला नाही. भोकरदन पालिकेत ते हरलेच पण जालना नगर परिषद न लढताच सोडून दिली. परतूरमध्येही लोणीकरांचे पानिपत झाले. बीड, हिंगोली, औरंगाबाद आणि लातूरमध्ये भाजपचे कमळ फुलले. उस्मानाबाद आणि परभणीत भाजपला खातेही उघडता आले नाही. जनतेने काँग्रेसला हद्दपार केले हा भाजपचा केवळ कांगावा असल्याचे मराठवाड्यातील जनतेने दाखवून दिले. राष्ट्रवादीने उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग, भूम आणि परंडा या ठिकाणी वर्चस्व निर्माण केले. राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबरचा हिशेब तुळजापूर, नळदुर्गमध्ये चुकता केला. पण उस्मानाबादची प्रतिष्ठेची जागा गमावली. याशिवाय बीड, परळी, जिंतूर, पाथरी, औसा आणि उमरी या नगराध्यक्षपदांच्या जागा देखील राष्ट्रवादीने जिंकल्या.

काँग्रेस-राष्ट्रवादीची खरी अडचण एमआयएमने केली होती. पण एमआयएमचा प्रभाव उतरत असल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले. मुस्लिमबहुल असलेल्या बीड नगरपरिषदेत ९ तर जिल्ह्यात ६ नगरसेवकांच्या जागा जिंकल्या. याशिवाय अधार्पूर, माजलगाव, कन्नड या ठिकाणी तुरळक जागा मिळाल्या. खुलताबादमध्ये तर खातेही उघडता आले नाही. अकबरोद्दीन ओवेसी यांनी मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या. तरी फारसा परिणाम झाला नाही. मनसेप्रमाणे अस्तित्व नगण्य झाले नाही, एवढेच त्यांना समाधान. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जिथे चांगला आणि विश्वासार्ह उमेदवार त्या ठिकाणी लोकांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार केला. नगरसेवकांमध्ये मुखेडला भाजपचे प्राबल्य राहिले पण नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचे बाबूराव देबडवार निवडून आले. अंबाजोगाईमध्ये राष्ट्रवादीचा पगडा असला तरी नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या रचना मोदी विजयी झाल्या. जालन्यामध्ये काँग्रेसच्या संगीता गोरंट्याल यांचा एकतर्फी विजय झाला. लक्ष्मीदर्शनाचे अवाजवी प्रदर्शन घडलेल्या उमरगा आणि मुरूममध्ये लोकमंगलकारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा दारूण पराभव झाला.

एकंदरच नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकींमध्ये विकासाचे राजकारण नव्हते तर लक्ष्मीदर्शनाची आस होती. आता किती मतदारांना लक्ष्मी प्रसन्न झाली हे कोणीच सांगणार नाही पण निवडणूक ज्या ज्या नगरी, लक्ष्मी तिथे वास करीही म्हण खरी असल्याचे अप्रत्यक्षपणे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेच. पण लक्ष्मीला कुंकू लावण्याचा मान मिळाला भाजपला आणि फारसा आटापिटा न करता विजयाची माळ गळी पडली काँग्रेसच्या, एवढेच विपर्यस्त झाले.