पर्यटन विकासाच्या मानसिकतेचा दुष्काळ

--संजीव उन्हाळे

घरी कामधेनू आणि पुढे ताक मागीअशी अवस्था औरंगाबाद या पर्यटन जिल्ह्याची झाली आहे. अजिंठा, वेरुळची समृध्द पार्श्वभूमी आणि जोडीला दौलताबाद, बीबी का मकबरा इथपासून गौताळा, शुलीभंजन, अंतूरचा किल्ला अशा कितीतरी ऐतिहासिक वारसा स्थळांची अक्षरश: प्रत्येक दहा-वीस किलोमीटरवर रेलचेल असलेला भारतातील हा एकमेवद्वितीय जिल्हा. त्यामुळेच १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळांमध्ये ताजच्याही अगोदर अजिंठा आणि वेरुळ या लेण्यांचा समावेश करण्यात आला. एवढेच नव्हे तर बारा ज्योतिर्लिंगातील तीन ज्योतिर्लिंगे मराठवाड्यातले. अंबाजोगाईजवळच्या धर्मापूरीमध्ये अक्षरश: प्रत्येक ठिकाणी शिल्प सापडतात. एकेकाळी धर्मापूरी हे वास्तुकलेचे विद्यापीठ होते. पण, काय उपयोग? या घडीला कोकणातील पर्यटन जोरात आहे आणि विदर्भातील नागपूर हा पर्यटन जिल्हा जाहीर करून जोमात कामाला सुरुवात झाली आहे.

सगळा दोष केवळ शासनाचाच नाही. आपल्या रोमारोमात पर्यटन अजून भिनलेले नाही. सोडा अजिंठा, वेरूळ, मूर्ती तोडा किंवा फोडा, नटीच्या गाडीभोवती आता लोकांचा गराडा’, अशा जमान्यात वारसा जपणा-या वास्तुंशी आपले काही नाते आहे हेच इथल्या लोकांना वाटत नाही. समोरून पर्यटक चालला तर साधे सुहास्य आमच्या चेह-यावर उमटत नाही. हीच उदासिनता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळापासून मंत्रालयातल्या बड्या बाबूंपर्यंत पहायला मिळते. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याच्या पर्यटनाचे हवे तसे मार्केटिंग कधी झालेच नाही. औरंगाबादचा पर्यटन महामंडळाचा ६६ खोल्यांचा रिसॉर्ट सुध्दा चालविता येत नाही. सर्व कारभार कंत्राटदार भरोसे आहे. तथापि, या मातीशी बांधिलकी असल्यामुळे भुषण गगराणी, डॉ. जगदीश पाटील यांच्यासारख्या काही अधिका-यांनी चांगली कामगिरी केली. पण, पर्यटनाचा गंधही नसलेले उपरे अधिकारी मिळाले आणि पर्यटनाचे बारा वाजले. चार वर्षांपासून बंद पडलेला वेरूळ महोत्सव  आयुक्त उमाकांत दांगटांच्या उत्साहामुळे यंदा झाला. असे अधिकारी दरवर्षी आपल्याकडे असतीलच असे नाही. आपल्या पर्यटनाचे बॅण्डिग करण्यात मोठा वाटा असलेला हा महोत्सव दरवर्षी व्हावा असे पुढा-यांना का वाटत नाही? किमान सर्वसामान्यांना तरी वाटते असेही नाही. पर्यटन मंत्रालयात नेहमीच आर्थिक  नियोजनात प्राधान्यक्रम बदलतो. कोकणाकडे केवळ बीच असताना चांगल्या नेतृत्वामुळे पर्यटन तिकडे वळले. आतातर विदर्भाचेच दिवस आहेत.  म्हणायला फक्त औरंगाबाद म्हणजे राज्याची पर्यटन राजधानी. या केवळ नावाच्या  कोडकौतुकाचे अप्रूप ते कसलेऔरंगाबादला हस्तशिल्प कलेचे विकास आयुक्तालय आहे पण, त्याची कल्पना फारशी कुणाला नाही. हातमागाचेसुध्दा विकास आयुक्तालय आहे पण, तेही नावालाच. महाराष्ट्र लघुउद्योग औद्योगिक विकास महामंडळाचे पैठणला तब्बल दीडशे हातमाग चालतात. एवढे कुठेही चालत नाहीत. पण चांगले काम करणा-या एका महिला अधिका-याला विभागाच्या बाहेर फेकून दिले. अशा सर्व प्रशासकीय कारभाराच्या पार्श्वभूमीवर आपले राज्य म्हणे २०१७ हे वर्ष महाराष्ट्र भेटवर्ष कसे साजरे करणार!

                केंद्र सरकारची नॅशनल हेरीटेज सिटी डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅग्युमेंटेशन म्हणजेच राष्ट्रीय वारसा शहरे विकास व उन्नतीकरण ही योजना केंद्र सरकारच्या नागरी विभागाकडून चालविण्यात येते. देशातील बारा शहरांचा यामध्ये समावेश करण्यात आला. पाचशे कोटी रुपये त्यावर खर्चण्यात आले. महाराष्ट्रातील एकही शहर त्यामध्ये नाही आणि औरंगाबादचा प्रस्ताव अजूनही दाखल झालेला नाही. आपल्या बावन्न दरवाजांपैकी सव्वीस दरवाजे टिकले आणि आता सोळा दरवाजे कसेबसे चांगल्या अवस्थेत आहेत. हा -हास थांबविण्याची गरज आहे. पण, घर फिरले की घराचे वासे फिरतात तसे औरंगाबादचे झाले आहे. दिल्ली, उदयपूर, जयपूरहून औरंगाबादला विमान यायचे तेव्हा जगाच्या पर्यटन नकाशावर हे शहर होते. पण, तो मार्ग बदलल्यापासून हे शहर पर्यटनदृष्टीने बाहेर फेकले गेले आहे. सध्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा चार महिन्यांचा पर्यटन काळ जोमात असतो. एखाद्या शिल्पाकडे निर्बुध्द माणसाने पाहिले तर तो त्याला दगड वाटतो पण, आपल्या विवेचनाने जो दगडालाही बोलायला लावतो तो गाईड पर्यटनातला मोठा दुवा आहे. पण, आठ महिने बिना कामाचे रहावे लागत असल्यामुळे नवीन पिढी गाईड म्हणून पुढे येत नाही आणि जुन्या गाईडची पिढी अस्तांचलाला चालली आहे. मुंबई, दिल्लीच्या बड्या टूर ऑपरेटरना औरंगाबाद हे मोठे खेडे वाटते. महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या खड्डेपुराणांचा महिमा इतका महान की नव्या को-या दीडशे मर्सिडीस खिळखिळ्या झाल्यापासून पर्यटकांनी कसे हिंडावे! आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात या तीन राज्यातून जास्त पर्यटके येतात. त्याठिकाणी औरंगाबादच्या पर्यटनाची बोटभर जाहिरात नसते.

                पर्यटनवाढीच्या दृष्टीने औरंगाबादला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सहा मोठ्या विमानांचे रात्रीच्या वेळी पार्किंग केले जावू शकते, इंधन भरता येते, पण विमानसेवेतील कंपन्यांना याची जाणीव करून देण्यासाठी एखादी परिषद घेणे आवश्यक आहे. औरंगाबादला बॉलिवूडचे टूरीझमसुध्दा चांगले वाढू शकते. मुंबईच्याजवळ असल्यामुळे ते सहज शक्य आहे. धोनीच्या चित्रपटाने एका हॉटेलची छान जाहिरात झाली. शेवटी पर्यटकांना सुरक्षा आणि सुखसोयी आवश्यक असतात, त्या सर्व औरंगाबादकडे आहे. पण, यासर्व गोष्टींना एकत्रितपणे पुढे नेणारे प्रभावी नेतृत्व नाही. हे दु:ख खरे असले तरी तेच किती दिवस कवटाळून बसणार? पर्यटन व्यवसायही हॉटेल, गाईड, टूर ऑपरेटर्स, दुकानदार यांच्यामध्ये विभागला गेला आहे. या सर्वांनीच एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. मुळामध्ये पर्यटन विकासासाठी पोषक असलेल्या मानसिकतेचा दुष्काळ आहे. शाळा, कॉलेजापासून पर्यटन आणि ऐतिहासिक वास्तू यांचे प्रेम निर्माण होणे गरजेचे आहे. तसे झाले तरच आगामी महाराष्ट्र भेटवर्षामध्ये किमान औरंगाबादला तरी न्याय मिळेल एवढीच अपेक्षा आहे.