करोनासुराचा खेळ: अवघे डळमळले भुमंडळ

- संजीव उन्हाळे

            आत्तापर्यंत ’’लांडगा आला रे आला,’’ या साध्या आवईने धडकी भरायची. आता ’’करोना आला रे आला’’ या शब्दाने जगभर धाक निर्माण केला आहे. आधीच अर्थव्यवस्था डळमळलेली. त्यात भांडवली बाजार घसरणे, कोसळणे, गडगडणे दररोज सुरू आहे. अर्थतज्ज्ञांनी तात्काळ करोनाकामॉकिक्स असा नवीन शब्द रूढ होत आहे. मराठवाड्यात बीड, नांदेड, जालना आणि औरंगाबादला संशयित सापडले आहे. सुदैवाने कोणीही पॉझिटीव्ह करोनाग्रस्त नाही. सामान्यांना आता कळेना की, मराठवाड्याच्या तळपत्या उन्हात करोनाचा विषाणू भाजून निघेल, मग कशाला भीती बाळगायची!

            तोंडाला पट्टी, हाताला सॅनिटायझर आणि सात्विक हिरव्या भाज्यांचा शाकाहार. आता खोकला आला तरी दाबून धरायचा. शिंक आली तर मुक्तपणे मोकळे व्हायचे नाही. उलट हातरूमालाने शिंक दाबून वर सॉरी म्हणायचे. जत्रा-यात्रा सर्वकाही बंद. साध्या शेकहँडवरसुध्दा बंदी. एरव्ही मोदी आणि ट्रम्प हातात हात घालून इतका वेळ शेकहँड करायचे की, भारताने अमेरिकेचा हात धरून ठेवला आहे की अमेरिकेने भारताचा हात दाबला आहे, हे काही कळायचे नाही. मोदींच्या गळाभेटी तर इतक्या की, सिनेमातील नटनट्या मागे पडल्या. पण आता करोना ने ट्रम्प आणि मोदी दोघेही हात जोडून म्हणतात, नमस्कार! (हिंदु संस्कृतीचा किती मोठा विजय). पण त्यातही काळाबाजार करणारी संस्कृती मागे नाही. तोंडपट्ट्या डुप्लिकेट निघाल्या आणि सॅनिटायझर म्हणजे रंगीत साबणी पाणी. आता प्रेयसी प्रियकराला हातात सॅनिटायझर असेल तरच हात देईल आणि तेही डुप्लिकेट निघाले तर श्रीमुखात बसली म्हणून समजा.

            यात लोहाजवळच्या काबेगावच्या बशरत हुसैन पठाणची वेगळीच प्रेमभंगकथा. हा बापुडा अभियंता सौदी अरेबियातील बहारीनमधून हैदराबादमार्गे गुडघ्याला बाशींग बांधून गावाकडे आला. दोन दिवस झाले नाही तर गावात दवंडी. बशर पठाणला आरोग्य खात्यापुढे आत्मसमर्पण करावे लागेल. त्याला उचलले आणि थेट नांदेडच्या शंकरराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले. तो नको-नको म्हणायचा आणि यंत्रणा करोना-करोना म्हणायची. एकदाची करोना टेस्ट झाली. धडधाकट विवाह इच्छुक बशरतला काहीच झाले नाही. पण तालुकाभर बशरतची चर्चा. आता करोना बदनाम झालेल्या बशरतला मुलगी कोण देणार? नातलगांचा भाबडा प्रश्न. आता नातलग त्याचा मोबाईल तर सोडाच पण साधी माहितीही देत नाहीत. एकदाचे लग्न होवून जाऊ द्या हो, एवढेच उत्तर मिळते. त्यात आता सरकारने लग्न समारंभावरही बंदी घातली आहे. डीजेचा नाच तर सोडा, साध्या सोय-यांची गर्दी होता कामा नये, आमची मंडळी तर समारंभप्रिय. त्यामुळे लग्नही थांबणार नाही आणि समारंभही. फारतर हुंड्याचे पॅकेज बदलेल. आयपीएलप्रमाणे तोंडपट्टी मारून नवरा नवरीला हार घालेल, त्याचे चित्रीकरण लोकल चॅनलवर किंवा हुंड्याच्या रक्कमेप्रमाणे मोठ्या चॅनलवरही दाखविले जाईल. अन् झोमॅटो, स्वीगीप्रमाणे घरोघरी जेवणाचे पदार्थ पोहोचविले जातील.

            सध्या सगळी यंत्रणा मोठी हैराण आहे. काही दिवसांपुर्वीच एका ट्रॅव्हलचे चाळीस पर्यटक मुंबईला उतरले. तेव्हा करोनाचे वारे नसल्यामुळे आपापल्या घरी निघून गेले. मग या यंत्रणेला प्रत्येकाचे घर धुंडाळून आणावे लागले. दुर्दैवाने त्यातच बरेचजण करोनाग्रस्त निघाले. महाराष्ट्रातील मंडळी इतकी हौशी की, अशा ट्रॅव्हल्सबरोबर तब्बल आठशे जण युरोपच्या यात्रेला गेले आहेत. आता ते विमानतळावर उतरले की, त्यांना करोनाच्या चाचणीला तोंड द्यावे लागेल. सध्या विमानतळाच्या याद्या घेवून पोलीस, महसूल आणि आरोग्य खाते प्रत्येकाचा शोध घेत होते. मध्यंतरी दुबईहून आलेल्या दाम्पत्याला पुण्याला सोडायला कॅबचा ड्रायव्हर गेला आणि तोही करोनाग्रस्त होवून बसला.

            दैव देते आणि कर्म नेते, असे मराठवाड्याचे खडतर नशीब. एकेकाळी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी असलेले अरविंदसिंग आता भारताच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचे अध्यक्ष झालेत. कसलाही गाजावाजा करता औरंगाबादच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी बंगलुरू, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, अशी पंधरा विमाने सुरू केली. या विमानाच्या प्रमुखांशी चर्चा केली. पण विमानाच्या फे-या ऐन रंगात यायला आणि करोना विषाणूची वावटळ सुटायला एकच गाठ पडली. विदेशी पर्यटक तर आलेच नाहीत, पण देशी पर्यटकसुध्दा येईनात. भीती एवढीच की, मोठ्या नवसाने सुरू झालेली ही विमानसेवा बंद पडू नये. नाही तर आमचे रडगाणे. औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय, आता त्याचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज, असे झाले आहे. गतवर्षीच जेट एअरवेज बंद पडले तेव्हा एखादेच विमान औरंगाबादला यायचे. चिकलठाण्याच्या सर्व म्हशी धावपट्टीलगतचे हिरवेगार गवत पाहून चरायला यायच्या आणि विमानतळाचे अधिकारी काहीच काम नसल्याने म्हशी हाकायचे. आता परत अशी नामुष्की होवू नये म्हणून करोनासूरमर्दिनीचे मंदिर उभे करायचा नवस म्हणे कोणीतरी करायला हवा.

            आता करोनावर अनेक देशी उपाय सुचविले जात आहेत. उस्मानाबादच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातच यज्ञयाग आणि धुपाने करोना कसा पळून जातो, याचे म्हणे प्रात्यक्षिक दाखविले आहे. अनेकांनी तपकीर ओढा म्हणून संदेश दिला. त्यामुळे तपकीरीचे दिवस चांगले आले आहेत. तथापि, चीनने मांसाहारावर बंदी घातली आणि मांसाहारामुळेच करोना झाला, असा अपप्रचार झाला. अनेकांचे पोल्ट्री उद्योग बंद पडले. चिकन कोणी खाईना, अंडी कोणी घेईना, मटनावर कोणी ताव मारेना. शेवटी करोनाग्रह स्कायलॅबसारखा गरीब बापुड्या कोंबड्यांवर आदळला. आपल्या समोर तडफडून कोंबड्या मेलेल्या पाहवत नसल्यामुळे अनेकांनी मोठे खंदक खोदून जिवंत कोंबड्यांना समाधी दिली. किती हा तळतळाट. सारे मंत्रीही मांसाहाराचा आणि करोनाचा काही संबंध नाही, असे सांगत असले तरी समाजमाध्यमांनी कोंबड्यांना बदनाम करून सोडले. मात्र दुस-या बाजुला शेंद्रा यात्रेवर बंदी घालून प्रशासनाने बळी जाणा-या शेकडो बोकडांचे प्राण वाचविले. याशिवाय, पैठणच्या नाथषष्ठीपासून चितेगावला होणा-या लाखो मुस्लिमांच्या इज्तेमावर बंदी घातलेली आहे. मराठवाडा साहित्य सम्मेलनावर ही बंदी लागू झाल्याने अनेक कवी मित्रांना यावेळी कवितासूड ओढता आला नाही.

            आश्चर्य याचे वाटते की, पंढरपूर, शिर्डी, तुळजापूरपासून सगळ्या मंदिरांची गर्दी कशी काय कमी झाली? एरव्ही ’’माझा एवढा प्रश्न सोडव, मी परत तुझ्या चरणी येतो,’’ असे नवशे कुठे गायब झालेत? नवशे नसल्याने हौशे आणि गवसे आलेच नाहीत. शेवटी करोनाला देवाच्या स्वाधीन करून भक्तमंडळी पळून गेलेली दिसतात. २०व्या शतकात आलेल्या प्लेगच्या साथीचे अल्बर्ट कामुने यथार्थ वर्णन केले आहे. पाच कोटी लोक या महामारीत मरण पावले. पण, कामुच्या काळात सोशल मिडिया नव्हता. शासनाने अगोदर सोशल मिडियावर अगाध उपाय सांगणा-या नेटक-यांची चांगली व्यवस्था लावली तर बरे होईल. त्यातल्या त्यात राज ठाकरे यांनी औरंगाबादला शिवजयंती होणारच, करोनाचा बाऊ चालू देणार नाही, असे ठाकरे भाषेत सांगितले तरी प्रशासनाने त्यांची काही एक ऐकले नाही.

            ते काहीही असो, चीन, अमेरिकेसारखे मांसाहारप्रिय देश लवकरच शाकाहारी झाल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या नेत्यांनाही हिंदु राष्ट्राचा शाकाहारीचा संदेश सर्व परदेशी लोकांना सांगण्याची मोठी संधी मिळाली आहे. करोनाने अगोदरच पर्यटन, हॉटेल, व्यापार, अशा अनेक गोष्टींना फटका बसला आहे. किमान आता मेक इन इंडियाचा नारा देत शाकाहारी हॉटेलच्या शाखा देशोदेशी निघतील, हे पहावे. भाज्या पिकवा अन् अर्थव्यवस्थेला गती द्या, एवढाच करोनासंदेश यामुळे देता येईल.