मराठा तितुका मेळवावा, माधवं जनाधारही वाढवावा


-- संजीव उन्हाळे

या विजयादशमीला भगवानगडावर अभूतपूर्व गर्दी होती. पंकजा मुंडे यांचा जनाधार दाखविणारी होती. पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्याच पाहिजेत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या घोषणा कितीही उत्स्फुर्त होत्या. अर्थात त्यातून वेगळे राजकीय अर्थ काढले जावू शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जनाधार मिळविण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. माळी-धनगर-वंजारी (माधवं) फॉर्मुल्याच्या माध्यमातून जनाधार वाढविण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे ही त्यामुळे भाजपची गरज आहे, एवढा जनाधार असलेले दुसरे नेतृत्व त्यांच्याकडे नाही.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत औरंगाबादला घेतलेल्या बचत गटाच्या मेळाव्यानंतर हे मोठे शक्तीप्रदर्शन होते. भगवानबाबा भक्तांसमोर कलम ३७०, ३०० राष्ट्रध्वज या सगळ्या मुद्द्यांनी राष्ट्रप्रेम कसे भरभरून वाहत होते. या भारलेल्या वातावरणातही ’’पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्याच पाहिजे’’ अशा टोकदार घोषणांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. चाणाक्ष अमित शहा यांच्या नजरेतून ही गोष्ट कशी सुटेल! घोषणा देणा-या समुहाला रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक धावून जात असतानाच शहांनी खुणेनेच त्यांना थांबविले. घोषणांना मोकळी वाट करून देण्यात आली. अर्थात पंकजाने आपण शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. त्यांची पक्षसंघ निष्ठा वादातीत असली तरी पक्षश्रेष्ठी सहसा अशा घोषणा खपवून घेत नाहीत? भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरी भूखंडप्रकरणी क्लीनचिट मिळूनही केवळ मुख्यमंत्रीपदाचे कथित दावेदार असल्यानेच त्यांना राजकीय विजनवासात पाठविण्यात आले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपणही मुख्यमंत्रीपदासाठी मनोमन इच्छुक असल्याचे कानोकानी पसरवले, अन् साधी आमदारकीची उमेदवारीसुध्दा मिळाली नाही. तथापि, पंकजाने दोन वर्षापूर्वी ’’मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री,’’ असे जाहीर करून टाकले. त्यानंतर जलसंधारणासारखी महत्त्वाची खाती तिच्याकडून काढून घेण्यात आली. जलयुक्त शिवारचा फ्लॅगशिप कार्यक्रमात पंकजाने खुपच मेहनत घेतली. या विधानाने फ्लॅग गेला, पण मंत्रीशीप वाचली. अर्थात जलयुक्त शिवारची नंतर अशी अवस्था झाली की, आता या कार्यक्रमाची जाहिरातीतसुध्दा ओल दिसत नाही. ग्रामविकासासारखे दुय्यम दर्जाचे खाते हाती राहिल तरीही त्यांनी अफाट मेहनत घेतली आणि पंतप्रधानांनादेखील त्यांच्या कामाची दखल घ्यावी लागली. गोपीनाथ मुंडेंनी फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष केले व पुढे ते मुख्यमंत्री झाले, या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी पंकजांची पाठराखण केली. खरी गोम अशी आहे की, तमाम वंजारी समाज आणि इतर मागासवर्गीयांचा मोठा जनाधार गोपीनाथ मुंडेंच्या वारसाहक्काने पंकजाला मिळाला आहे. त्यामुळेच कदाचित संयत राहणा-या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी महिला मुख्यमंत्री म्हणून आपल्या बहिणीची उघडपणे तरफदारी केली असावी.

                काँग्रेसच्या काळात कोणीही तुर्रमखान आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे सांगायचा अन् खरोखरच बाबासाहेब भोसलेसारखे मुख्यमंत्री होवूनही गेले. पण, नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा सारा बाजच बदलून टाकला आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक जशी नरेंद्र मोदी केंद्रीत होती तशी विधानसभेची ही निवडणूक केवळ ’देवेंद्र केंद्रीत’ आहे. संघाचा एकचालकानुवर्ती बाणा मोदींनी केंद्रात आणि फडणवीसांनी राज्यात राबविला. सबकुछ फडणवीस, बाकी मंत्र्यांची नावे आणि त्यांची खातीसुध्दा लक्षात ठेवण्याची गरजच नाही. केंद्रात जसे पीएमओ (पंतप्रधान कार्यालय) तसे राज्यात सीएमओ (मुख्यमंत्री कार्यालय) असे समांतर शक्तीकेंद्र मुख्य सचिवांच्या उतरंडीपेक्षा प्रभावी ठरले आहे.

                भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये मराठा नेते आणण्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल. नव्वदच्या दशकामध्ये भाजपने माळी, धनगर, वंजारी असा ’माधवं’ फॉम्र्युला आणला अन् भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी तो प्रभावीपणे राबविला. खरेतर, मुंडे त्यावेळीही भाजपची राजकीय गरज होती. इतर मागासवर्गीयांचा जनाधार त्यांनी विस्तारीत केला. २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपला मराठा नेतृत्वाची अभावग्रस्तता लक्षात आली. रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, विनोद तावडे (चंद्रकांत पाटील तेव्हा राजकीयदृष्टीपथात नव्हते) अशी मोजकी मराठा मंडळी होती. रावसाहेबांना प्रदेशाध्यक्ष केले तर महाराष्ट्राचे रावसाहेब (मुख्यमंत्री) असे ते बोलू लागले. शेवटी त्यांची रवानगी केंद्रात केली गेली. आतापर्यंतचे महाराष्ट्राचे नेतृत्व मराठाकेंद्रीत राहिले परंतु त्याचे दोर काँग्रेसश्रेष्ठींच्या हातात पूर्णपणे कधीच गेले नव्हते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना महाराष्ट्रातील मराठा नेतृत्व मुठीत ठेवणे शेवटपर्यंत जमले नाही. त्यामुळेच अंतुलेंना मुख्यमंत्रीपदाचा डाव अध्र्यावर सोडावा लागला. नरेंद्र मोदी – अमित शहा - देवेंद्र फडणवीस या त्रिकुटाने महाराष्ट्रात मात्र मराठा नेतृत्व अंकित ठेवले. प्रत्यक्ष काम फडणवीसांनी केले आणि व्युहरचना मोदी-शहा यांनी आखली. मराठा आरक्षणाचे नुसते गाजरच दाखविले नाही तर राज्याच्या अखत्यारित जे काही आहे ते त्यांनी केल्यामुळे अनेक गाजरपारखी मराठा चकीत झाले. दुस-या बाजुला राजकीय पुढारी, संस्थाचालक अन् साखरसम्राटांवर आर्थिक गैरव्यवहाराचा दंडुका उगारला. सहकार चळवळ मोडीत काढली. साखर कारखानदारीचे कंबरडे मोडले अन् सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या. हताश झालेल्या या नेत्यांना ईडीचा धाक दाखविण्यात आला. राजकीय गरजवंत म्हणून म्हणा की शरणार्थी म्हणून म्हणा मराठ्यांचा ओघ पश्चिम महाराष्ट्रात भाजपकडे येवू लागला. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर शरद पवारांसारख्या मातब्बर मराठा नेत्याशी दोन हात केले, पण फडणवीसांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात जावून त्यांनाच थेट खेटण्याची राजकीय जोखीम पत्करली. भाजप उमेदवारांच्या यादीकडे नजर फिरविली तर पश्चिम महाराष्ट्रातील जातीची गणितामध्ये मराठा जनाधार बळकट केला. राज्याच्या भाजपच्या यादीमध्ये ११५ उमेदवार मराठा आहेत. शेटजी-भटजीचा म्हणून हीनवला जाणारा पक्ष आज राजे-महाराजे, संस्थानिक, साखर सम्राट यांचा बडेजाव घेवून वावरत आहे. हा मराठा जनाधार हा भाजपतील ऐतिहासिक बदल आहे.

                तथापि, मराठ्यांचा एकंदर इतिहास लक्षात घेता, भाजपला राजकीय जोखीम घ्यायची नाही. त्यासाठी इतर मागासवर्गीयांचा मुलाधार भाजपला कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये इतर मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. अमित शहा यांनी तर इतर मागासवर्गीयांच्या बालेकिल्ल्यामध्ये सभा घेण्याचा विडाच उचलला आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी इतर मागासवर्गीयांचा हा जनाधार मिळविण्यासाठी बरेच कष्ट घेतले. तथापि, मुंडे यांचा पक्षाने वापर केला आणि मंत्रिमंडळ बनविताना का-कु करीत शेवटच्या क्षणी ग्रामविकासासारखे दुय्यम खाते दिले. संघ-भाजपमध्ये होणारी गळचेपी त्यांनी अनेकवेळा बोलून दाखविली. दुर्दैवाने ते अकाली गेले. अन्यथा महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते. गोपीनाथ मुंडे यांची लोकप्रियता किती आहे, याचा अंदाज भाजप नेत्यांना आला नाही किंवा त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ उठविता आला नाही. दोन वर्षापूर्वी झालेल्या भाजप अधिवेशनात कुठेही गोपीनाथ मुंडे यांचे मोठेपण अधोरेखित केले गेले नव्हते. भगवानगडावरची दस-याची गर्दी ही केवळ महाराष्ट्रापूरती मर्यादित नव्हती तर गुजरात, राजस्थान आणि आंध्रप्रदेशमधून वंजारी बांधव केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमापोटी आले होते. हा राजकीय वारसा मिळाल्यामुळेच पंकजा मुंडे ही भाजपची अपरिहार्यता आहे. एवढा जनाधार असलेले याघडीला दुसरे नेतृत्व नाही. प्रमोद महाजन यांची कन्या पुनम महाजन हिला २०१४ पर्यंत राजकीय संधीची प्रतिक्षा करावी लागली, ही वस्तुस्थिती आहे. महाजन यांचे मोठेपण मान्य केले तरी मुंडे यांच्या लोकप्रियतेची सर त्याला येवू शकत नाही. मुंडे यांच्या निधनानंतरही तो समाज त्यांच्या नावाशी बांधला गेलेला आहे. अर्थात ही सगळी अनुकुलता म्हणजे आपला अधिकार आहे, असे पंकजाने समजण्याचे कारण नाही. गोपीनाथरावांना भगवानगडावरून दिल्ली दिसत होती. दिल्लीचे राजकारण करताना त्यांनी बहुजनांचे नेते म्हणूनही पुढाकार घेतला. स्वकीय-खुशमस्क-यांना दूर सारले, हे आता पंकजाने दीर्घकालीन राजकारण करताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मोदी-शहा ही जोडगोळी सध्या पंकजावर खुश असली तरी संघनेतृत्व कितपत तिच्या बाजुने उभे राहिल? सध्यातरी बीड जिल्ह्यात डीएम विरूध्द पीएम म्हणजे धनंजय विरूध्द पंकजा, हा परळीचा सामना चुरशीचा आहे. परळीच्या खिंडीमध्ये तिला गाठण्याचा राजकीय डाव स्वाभाविकपणे असू शकतो. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातील आमदार निवडून आणण्यापेक्षा परळीकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.