...हवी आता ‘मागास’मुक्ती!

- संजीव उन्हाळे

प्रचंड नापिकी, दुष्काळ, वाढते दारिद्र्य या पाश्र्वभूमीवर यावेळेसचा मराठवाडा मुक्तिदिन झाकोळला आहे. हैदराबाद संस्थानापासून मराठवाड्याची मुक्ती झाली पण दैना काही फिटली नाही. उलट या विभागाचे आता वाळवंटीकरण होऊ लागले आहे. यावर्षी तर पाण्याचा ठणठणाट आहे. मुक्ती मिळाली पण मागासलेपण वाढत गेले. भाजप सरकारने देश काँग्रेसमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. आता या सरकारने मराठवाडा दारिद्र्यमुक्त कसा होईल या दृष्टीने नेटाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे. अकबराने एकदा भरदरबारात विचारले, २७ वजा किती ? सगळे उत्तर देतात, अठरा. बिरबल अफलातूनच होता. तो उत्तरला, २७ वजा बरोबर . नव्हे मोठे शून्यअकबरासह सगळा दरबार संभ्रमात. तेव्हा बिरबल म्हणाला, एवूâ नक्षत्र २७, त्यातून पावसाची नक्षत्रे वजा केली तर बाकी उरते शून्य! किती सार्थ आणि समर्पक विचार. पाऊस नसेल तर सर्वकाही व्यर्थ! नक्षत्रांचा मिळून साडेचार महिन्यांचा पावसाळा. मराठवाड्यात नक्षत्रांनी तर आपलं जलयुक्त पाऊल ठेवलं नाही. आता उरली शेवटची उत्तरा आणि हस्त ही दोनच नक्षत्रे. सरसरणारा, झरझरणारा, कोसळणारा, अवखळ तरी समंजस, कधी छळवादी तर कधी शांत असा पाऊस गेल्या अनेक वर्षात अनुभवास आसला नाही. कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला. ठिकठिकाणी ढगात गोळ्या झाडल्या गेल्या. पण पाऊस काही आला नाही. तिकडे नाशिकपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकणापर्यंत महापूर, अन् इकडे मराठवाडा कोरडाठाक! जायकवाडी भरलेय तेवढाच काय तो दिलासा.

बघता बघता १७ सप्टेंबर आला. मराठवाडा मुक्ती दिन! मुक्तीचा एवढा फायदा घेतला की या विभागाचे वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. हीच मुक्ती आज दीन झाली आहे, दैन्य वाढत आहे आणि दैना तर जीवघेणी! मुक्तीसंग्राम ओजस्वी होता. सर्व संस्थाने भारताच्या संघराज्यात १९४७ मध्येच विलीन झाली. तथापि, भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागी असलेले हैदराबाद संस्थान वेगवेगळ्या सलतनीशी आणि बादशहांशी लढत लढत ४०० वर्षे आपले अस्तित्व टिकवून होते. निझामही वर्षभर हटून बसला. शेवटी निश्चित निर्णय घेणारे पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. १३ सप्टेंबर १९४८ रोजी भारताची फौज या संस्थानात चारही बाजूंनी घुसली. दिमतीला जीवाची बाजी लावणारे शेकडो स्वातंत्र्यसैनिक होते. १७ सप्टेंबर रोजी निझामने शरणागतीचा पांढरा ध्वज लावला. हैदराबादच्या चारमिनारवरील असभशाही झेंडा खाली आला. तेथे तिरंगा डौलाने फडकू लागला. इतिहासाचा विसर किती लवकर पडतो ना! त्यानंतर शहागंजच्या घडाळाजवळ चमणच्या मध्यभागी वल्लभभार्इंचा पुतळा उभारण्यात आला. आणीबाणीपर्यंत अनेक ओजस्वी भाषणे या ठिकाणी झाली. आज हा पुतळा ओशाळल्यागत धूळ खात पडून आहे. बाजार आणि दुकानांच्या भाऊगर्दीत हा पुतळा दृष्टीसही पडत नाही. तिकडे गुजरातेत नेहरूंना शह देण्यासाठी जगातला सर्वात उंच सरदार वल्लभभाई यांचा पुतळा उभारला गेला. मग या पुतळ्याकडे का लक्ष दिले नाही. उलट हैदराबाद संस्थानाच्या निर्मितीचे बरेचसे श्रेय वल्लभभार्इंकडे जाते. पण परिस्थिती उलटीच. अडीच लाख रझाकारांच्या मुलकी सेनेचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल कासीम रझवी याने मराठवाड्यातील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. त्याच्याच विचारांचा वारसा घेऊन पुढे चालणारा एक हैदराबादी पक्ष मराठवाड्यात आपली पाळेमुळे रोवली. एवढेच नव्हे तर या पक्षाचा खासदार नुकताच दिल्लीच्या तख्तावर बसला आहे याचे विस्मरण कसे काय होते. कासीम रझवीचे अत्याचार आणि उद्दामपणा जेव्हा पराकोटीला पोहचला तेव्हा १९३८ मध्ये त्यागमूर्ती स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली पाच सत्याग्रहींनी पहिला सत्याग्रह केला. त्यानंतर आर्य समाज आणि विद्यार्थी मोठया प्रमाणावर ठिकठिकाणी सत्याग्रहात उतरले. त्याकाळी औरंगाबाद हे वंदे मातरम चळवळीचे केंद्र होते. या आंदोलनाचे स्मरण राहावे म्हणून वंदे मातरम सभागृह बांधण्याचे शासनाने ठरविले. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाखालील किलेअर्कजवळील प्राचार्यांचा बंगला पाडण्यात आला. पण गेल्या अनेक वर्षांपासून या वंदे मातरम सभागृहाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. वंदे मातरमचा वारसा सांगणा-या मंडळींनी २५ वर्षे काय केले? आता तर यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. शेवटी इतिहासाने आता मराठवाड्यावर कोणते आसूड ओढण्याचे शिल्लक ठेवले आहे. याचि साठी केला होता अट्टाहास असे म्हणून आपले आयुष्य वेचणा-या अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा तळतळाट तेवढा आशिर्वादादाखल आपल्याला मिळत आहे.

एकेकाळी सधनसुपीक म्हणविणारा उस्मानाबाद जिल्हा तेव्हा गुलबर्गा विभागाशी जोडलेला होता. पुढे याच जिल्ह्यातून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. यावर्षी गणपती विसर्जनासाठी लातूरला पाणी नव्हते शेवटी गणपतीच्या मूर्ती प्रशासनाच्या स्वाधीन कराव्या लागल्या. अशी वेळ कधी आली नव्हती. एकेवर्षी रेल्वेने पाणी आणले गेले पण गणपती विसर्जन झाले. या परिस्थितीचे गांभिर्य रात्रन्दिनी छंद निवडणुकांचा समजून राज्य करणा-या सत्ताधारी मंडळींना हाच गणपती म्हणे प्रसन्न होणार आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती निलम गो-हे यांनी बीड जिल्ह्यातील महिलांच्या गर्भाशयाबद्दलचा एक अहवाल नुकताच शासनाला सादर केला आहे. या अहवालात असे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे की, मोजक्या दहा डॉक्टरांनी गर्भाशय काढण्याचा गोरखधंदा केलेला आहे. हा प्रथमदर्शनी अहवाल असला तरी केवळ पोटासाठी महिलांना आपले गर्भाशय काढून टाकावे लागते यासारखी दुसरे लांच्छन समाजाला असू शकत नाही. शेतकरी आत्महत्या घडत आहेत. मराठवाड्यातील ग्रामीण दारिद्र्याची टक्केवारी भयावह आहे. २२ टक्के लोक दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत. दुष्काळ, नापिकी आणि शेती उत्पन्नातील घट यामुळे जिल्हानिहाय कृषीवृद्धी दर हा घटलेला आहे. शेजारचा नाशिक जिल्हा कृषी संलग्न उत्पन्नामध्ये सर्वात आघाडीवर आहे तर हिंगोली जिल्हा राज्यात सर्वात पिछाडीवर आहे. इकडे सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी या विषयावर जाहिरातींचा मारा तेवढा सुरू आहे. लक्षणीय गोष्ट अशी की महाराष्ट्र सरकारचा फ्लॅगशिप कार्यक्रम असलेल्या जलयुक्त शिवारची जाहिरातबाजी पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. जायकवाडी वगळता मराठवाड्यातील सर्व धरणांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पाण्याचा मृतसाठासुद्धा अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे. खरीप गेले, रबीची आशा नाही. थोर स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेल्या वैधानिक विकास मंडळाचे पूर्णपणे वाटोळे करून ठेवले आहे. राज्यपाल अधिकार वापरत नाहीत आणि या मंडळाचा केवळ पांढरा हत्ती करून ठेवला आहे. मुक्ती झाली पण मागासलेपण वाढले.

दुर्दैवाने नेमका हैदराबाद संस्थानातील मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांचा भाग हवामान बदलाच्या तडाख्यात सापडलेला आहे. सुलतानी संकटाबरोबर हे अस्मानी संकटही काही कमी नाही. मुक्ती झाली पण वर्षागणिक मागासलेपण वाढत आहे. संतांची भूमी म्हणून केवळ गोंजारले जाते. प्रत्यक्षात मोठया प्रमाणावर स्थलांतर घडत आहे. मागासमुक्तीसाठी प्रयत्न केले गेला नाही तर मराठवाडयाचे वेगळे अस्तित्वच राहणार नाही.